सातारा लोकसभेबाबत चर्चा तर होणारच आ. बाळासाहेब पाटील; कराडमध्ये 31 मार्चला इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
सातारा लोकसभेबाबत चर्चा तर होणारच
आ. बाळासाहेब पाटील; कराडमध्ये 31 मार्चला इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराबद्दल सध्या जिल्हाभरात अनेकविध चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नसून इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते यावर अंतिम निर्णय घेतील. उमेदवारीबाबत चर्चा तर होतच राहील. इंडिया आघाडीतील घटक पक्षांतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा चर्चा सुरू आहेत. परंतु, वरिष्ठ नेते जो आदेश देतील; त्यानुसार आम्ही सर्वजण काम करणार आहोत, अशी माहिती माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड येथे घेण्यात येणाऱ्या इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तुमच्याही नावाची चर्चा आहे? या प्रश्नाच्या उत्तरदाखल ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. समीर देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत यादव, आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, सातारा येथे नुकतीच इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीबाबत चर्चा विनिमय करून प्रचाराची रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तालुका सरावर इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मेळावे घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कराड येथील हॉटेल पंकज येथे रविवार, दि. 31 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कराड तालुक्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ते म्हणाले, कराडच्या मेळाव्यात लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराची रूपरेषा जाहीर करण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेण्यात येतील. कार्यकर्त्यांना पक्षांची ध्येय-धोरणे सांगण्यात येतील. त्या दृष्टीने तालुकास्तरावर कार्यकर्ता मेळावे घेण्यात येत आहेत. यानुसार मेढा-जावळी, सातारा, पाटण, वाई, कोरेगाव याठिकाणीही कार्यकर्ते मेळावे घेण्यात येणार आहे.
मनोहर शिंदे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात सातारा येथील इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. येथील उमेदवाराबद्धल सर्वत्र चर्चा आहे. परंतु, कराडला घेण्यात येणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
हर्षद कदम म्हणाले, इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्धल जो निर्णय घेण्यात येईल, त्यानुसार आम्ही सर्वजन काम करणार आहोत.