पोलीस भरतीसाठी एसइबीसी दाखले तात्काळ द्या : मनोज माळी
पोलीस भरतीसाठी एसइबीसी दाखले तात्काळ द्या
मनोज माळी; प्रहरचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
सध्या राज्यामध्ये मोठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी आठ दिवस उरले असतानाही शासन स्तरावरून आत्तापर्यंत दाखले देण्याबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी लागणारे एसइबीसी दाखले तात्काळ द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 दिली आहे. परंतु, त्यासाठी आठ दिवस उरले असतानाही शासन स्तरावरून आत्तापर्यंत दाखले देण्याबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. दररोज शेकडो तरुण प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारत असून त्यांना सेतू विभागाकडून वेगवेगळी उत्तर देण्यात येत आहेत. मुदतपूर्वी आपल्याला दाखले मिळणार का? पोलीस भरतीसाठी अर्ज खुल्या प्रवर्गातून भरायचा की एसइबीसीमधून भरायचा याबाबत तरुणांमध्ये मोठा गोंधळात आहे. तरी शासन स्तरावर दाखले मिळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, पोलीस भरतीची मुदतही वाढवावी, जिल्हास्तरावर दाखले देण्यासंदर्भात पर्यायी उपाययोजना करावी, तसेच दाखल्यांवरील ऑफलाइन सह्या बंद कराव्यात. याची दखल तात्काळ न घेतल्यास प्रशासकीय कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांना देण्यात आल्या आहेत.