समाजकल्याणकडून अखर्चित निधी ठेवून दिव्यांगांवर अन्याय : मनोज माळी
समाजकल्याणकडून अखर्चित निधी ठेवून दिव्यांगांवर अन्याय
मनोज माळी; 85 हजार दिव्यांगांना फटका, दोषींवर कारवाईची मागणी
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
समाजकल्याण विभागाने अखर्चित निधी ठेवून सातारा जिल्ह्यात दिव्यांगांवर अन्याय केला आहे. हा निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवलाच कसा? असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मनोज माळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना सदरचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित ठेवून जनतेचे अतोनात नुकसान केले आहे. त्यात समाजकल्याण विभागाने साडेचार कोटी रुपये निधी अखर्चित ठेवून जिल्ह्यातील सुमारे 85 हजार दिव्यांगांवर अन्याय केला आहे. एकीकडे दिव्यांगांना आधार देण्यासाठी शासन सर्वत्र प्रयत्न करत असताना जिल्ह्याचा समाजकल्याण विभाग मात्र मंजूर निधी खर्च न करता दिव्यांगांवर अन्याय करत आहे.
आरोग्य विभागाने 4 कोटी 18 लाख इतका निधी अखर्चित ठेवला आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेतील जवळपास सर्वच विभागांचा 46 कोटी 89 लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, समाजकल्याणसह विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.