कराड दक्षिणमध्ये रस्ते विकासासाठी २३० कोटींचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान
कराड दक्षिणमध्ये रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान
कराड दक्षिणमध्ये रस्ते विकासासाठी २३० कोटींचा निधी मंजूर
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान
कराड : प्रतिनिधी –
कराड दक्षिणमध्ये रस्ते विकासाचे जाळे आणखी गतिमान होणार आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हायब्रिड अन्युईटी मॉडेल टप्पा २ अंतर्गत पाटण तालुका हद्द – किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन (पाटण तालुका हद्द ते शेणोली स्टेशन रस्ता – एकूण लांबी ३८.५० कि.मी.) या रस्त्याच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून २३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कराड दक्षिणमधील रस्त्यांच्या विकासासाठी इतक्या मोठ्या निधीला मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाजप सरकारकडून या निधीला मंजुरी मिळाली असून, लवकरच या रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार आहे.
डिचोली – नवजा – हेळवाक – मोरगिरी – साजूर – तांबवे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन रा. मा. १४८ कि.मी. ६२/५०० ते १०१ (एकूण लांबी ३८.५० कि.मी.) हा अत्यंत महत्वाचा राज्यमार्ग असून, गुहागर – चिपळूण – कराड – जत – विजापूर राष्ट्रीय महामार्ग १६६-ई या महामार्गास समांतर मार्ग आहे. दरम्यान, पाटण तालुका हद्द – किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन हा रस्ता बागायती क्षेत्रातून जाणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे.
या रस्त्यावर ऊसवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच या रस्त्यावर मोठ्या लोकसंख्येची अनेक गावे आहेत. तसेच हा राज्यमार्ग पुढे जाऊन, आशियाई महामार्ग क्र. ४७ व राष्ट्रीय महामार्ग २६६ या दोन्ही महामार्गांना जोडतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाल्यास या संपूर्ण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या रस्त्याचे काम हायब्रिड अन्युईटी मॉडेल टप्पा २ अंतर्गत करुन, त्यासाठी निधी मंजूर करावा, अशा मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. तसेच वाठार (ता. कराड) येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही डॉ. भोसले यांनी ना. चव्हाण यांच्याकडे ही जाहीर मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत, शासनाने या रस्त्याच्या कामासाठी २३० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या कामाची इ निविदा ७ मार्च २०२४ रोजी मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई यांनी प्रसिध्द केलेली आहे.
या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील किरपे, येणके, पोतले, घारेवाडी, विंग, धोंडेवाडी, काले, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, जुळेवाडी व शेणोली स्टेशन या गावांवरुन जाणाऱ्या रस्त्याचे सुधारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे. या निधीसाठी प्रयत्न केल्याबद्दल या गावांमधील ग्रामस्थांमधून डॉ. भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
प्रतिक्रिया
पाटण तालुका हद्द – किरपे – शेणोली स्टेशन या रस्त्यासाठी २३० कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे, या मार्गावरील रस्ता सुसूज्ज व प्रशस्त होणार आहे. या रस्त्यामुळे इथल्या भागातल्या लोकांचा वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर या प्रस्तावित रस्त्यामुळे भागातील लोकांचे दळणवळण सुलभ होणार आहे. सातत्याने या विकासकामाचा पाठपुरावा करून, स्थानिक लोकांच्या मागणीला न्याय देऊ शकलो, याचे निश्चितच समाधान आहे. लवकरात लवकर या रस्ताचे काम सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
– डॉ. अतुल भोसले
सातारा लोकसभा प्रभारी,भाजपा