श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी १० कोटींचा निधी मंजूर डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; रस्ते विकास महामंडळामार्फत होणार विकास
श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी १० कोटींचा निधी मंजूर
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; रस्ते विकास महामंडळामार्फत होणार विकास
कराड : प्रतिनिधी –
सैदापूर (ता. कराड) येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी शासनाने मान्यता दिली आहेत. तसेच सुमारे १० कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले आणि श्रीनिवास जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे जिर्णोद्धाराचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळामार्फत करण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडाही तयार करण्यात आल्याने लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे.
कृष्णा-कोयनेच्या तीरावर वसलेल्या सैदापूर गावाच्या पवित्र भूमीत, कृष्णामाईच्या तीरावर पूर्वाभिमुखी असे श्री पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. श्री पावकेश्व र मंदिराचे बांधकाम हे साधारण १७ व्या शतकात झालेले असून, मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेचे नमुने पाहावयास मिळतात. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे, की शिवलिंगावर ओतलेले पाणी हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते. पण श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे. इथं गोमुखाऐवजी मकरमुखातून (मगरीचे तोंड) बाहेर जाते. असे शिल्प फार कमी मंदिरात पहावयास मिळते. मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर होती, परंतु ती कालांतराने मूजविण्यात आली. पण त्या विहिरीचे अजूनही चौथेरे दिसून येतात. एकूणच श्री पावकेश्वराचे मंदिर प्राचीन व पवित्र असे शिवलिंग मंदिर आहे. पूर्वेच्या दरवाजाबाहेर उंच अशी एक दीपमाळ असून, ही दीपमाळ १३ व्या शतकातील असावी, असे मानले जाते.
असा हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांमधून सतत होत होती. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत, सैदापुरातील या प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील १० प्राचीन महादेव मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात येणार आहे. या योजनेत सैदापूरातील श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार ना. फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या जिर्णोद्धार योजनेत श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश केला आहे. महामंडळाने तातडीने याबाबत ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन, विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. दरम्यान, सैदापूर येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र विधीमंडळातील माजी सचिव श्रीनिवास जाधव यांनी श्री पावकेश्वर मंदिराचा विकास आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुढाकारामुळे श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लवकर मार्गी लागण्यास मदत झाली आहे. श्री पावकेश्वर मंदिराचा प्राचीन सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी डॉ. अतुल भोसले व श्रीनिवास जाधव यांनी प्रयत्न केल्याबद्धल सैदापूरवासीयांतून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.