जीवनशैलीशिक्षण

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाचा पाया भक्कम करावा : डॉ. सुरेश भोसले

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाचा पाया भक्कम करावा : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा विद्यापीठात फार्मसी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परिषद उत्साहात; ७५० विद्यार्थ्यांचा सहभाग
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्मितीचे नवनवीन तंत्र आत्मसात करून, संशोधनाचा पाया भक्कम करावा, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि वाठार येथील जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस. पाटील, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. आर. भोसले, आरोग्यलाभ फाउंडेशनचे संचालक डॉ. एस. बी. भिसे, प्राचार्य सौ. शुभांगी पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, ‘पेशंट स्पेसिफिक मेडिकेशन’ ही काळाची गरज असून, फार्म.डी.च्या विद्यार्थ्यांनी फार्माकोलॉजी आणि रिव्हर्स फार्माकोलॉजी या दोन विषयांच्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे. तसेच औषधनिर्मितीचे नवनवीन तंत्र आत्मसात करून, संशोधनाचा पाया भक्कम करावा.
प्र-कुलगुरु प्रा.डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट लर्निंग, फार्मास्युटिकल कंपन्यांचा विकास यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. भिसे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत, नव्या शैक्षणिक पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले.
या परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत १७० विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक पोस्टरचे सादरीकरण केले. या स्पर्धेत ऐश्वर्या पाटील, रितिका कोंडुसकर, कीर्ती महामुनी, सौ. प्रतीक्षा जाधव यांनी बक्षीसे प्राप्त केली. कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्तविक केले. प्रा. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुप पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »