आजच्या युवकांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आदर्श घ्यावा : डॉ.अरुण घोडके
श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
आजच्या तरुणांनी शिवरायांचा इतिहास वाचवा त्यांचे शौर्य, रणनीती राज्यकारभार करण्याची पद्धत, नितीमूल्य जपण्याची शिकवणूक त्यांचे जाज्वल्य विचार याचा आदर्श घ्यावा व त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. अरुण घोडके यांनी केले. घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचे स्पंदन 2k24 हा स्नेहसंमेलन सोहळा कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. या स्नेहसंमेलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सचिव प्रसून जोहरी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉ. अरुण घोडके यांचे बुके देऊन स्वागत केले तर सचिव प्रसून जोहरी यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बुके देऊन स्वागत केले. यावेळी बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, डि फार्मसी च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉ. अरुण घोडके म्हणाले शिवछत्रपती एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते. मुघलांच्या जुलमी राजवटी पासून रयतेला दिलासा देणारे ते एक यशवंत राजे होते. रयतेतील सर्वात खालच्या थरातील लोकांना स्वराज्य कसे असते हे त्यांनीच दाखवले होते म्हणूनच शिवछत्रपतींना युगप्रवर्तक म्हटले जाते. हे स्वराज्य आपले आहे हा राजा आपला आहे येथील धनदौलत, कायदे कानून आपल्या हितासाठीच आहेत असा विश्वास शिवरायांनी जनतेत निर्माण केला होता. त्यांनी सरंजामशाही मोडून काढली होती, वतनदारी नष्ट केली होती, जहागीरदारी संपुष्टात आणली होती. सर्व धर्माच्या लोकांना अभय देऊन निर्भय केले होते. स्वातंत्र्य, श्रेष्ठ नीतिमूल्य व शील संवर्धन करून जनतेसमोर आदर्श निर्माण केला होता.
यावेळी डॉ. अरुण घोडके यांनी शिवचरित्रातील अनेक घटना विद्यार्थ्यांना सांगून सर्व सभागृह मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्राचार्य डॉ .स्वानंद कुलकर्णी यांनी संस्थेची माहिती देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला व भविष्यातील ध्येये सर्वांसमोर मांडली. वर्षभरातील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना समान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. चंद्रकांत चव्हाण यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला व मान्यवरांचे स्वागत केले. सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका पूनम यादव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्नेहसंमेलन सोहळ्यास बीटेक व पॉलीटेक्निक महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी मांनले.