डॉ.सुरेश भोसले यांचा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मान
डॉ.सुरेश भोसले यांचा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मान
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड तालुक्यातील शेरे, दुशेरे, गोंदी व खुबी आणि वाळवा तालुक्यातील लवंडमाची ग्रामपंचायतीच्यावतीने कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. भोसले यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा विद्यापीठाच्या दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी. यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, बाजीराव निकम, दयानंद पाटील, कृष्णा बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, इनोव्हेशन ॲन्ड इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. आशा काकडे, डॉ. सतीश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. भोसले म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांनी एकत्र येऊन केलेला हा सन्मान माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. ‘भागाचा सर्वांगीण विकास झाला; तर समाजाची प्रगती होते’, हा आप्पांनी दिलेला विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून शेरे, दुशेरे, गोंदी, खुबी व लवंडमाची ही गावे दत्तक घेतली. याठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच पिण्याचे शुद्ध पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या बाबींकडे लक्ष देऊन सुधारणा केल्या जात आहेत. कृष्णा परिवाराने शेती, आरोग्य, शिक्षण, आर्थिक अशा क्षेत्रात भरीव योगदान दिले असून, या कामात परिसरातील लोकांकडून मोठे सहकार्य लाभले आहे. भविष्यातही या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, डॉ. सुरेशबाबा हे आप्पासाहेबांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांच्या रुपाने या भागाला एक प्रामाणिक व दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले आहे. कोराना काळात त्यांनी हजारो कुटुंबांना संकटातून वाचविले. त्यांच्या या सामाजिक कार्याचा ५ गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला सन्मान सोहळा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी शेरेच्या सरपंच शीतल निकम, दुशेरेचे सरपंच आनंदा गायकवाड, गोंदीचे सरपंच सुबराव पवार, खुबीच्या सरपंच जयश्री माने व लवंडमाचीच्या सरपंच छाया दुर्गावळे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.