पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी नरक बनलीय चित्रा वाघ; संदेशखली येथील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये आंदोलन
पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी नरक बनलीय
चित्रा वाघ; संदेशखली येथील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये आंदोलन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी खुद्द ममता बॅनर्जींसारखी एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जात आहे. या महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तात्काळ चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवा, अशी मागणी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा व भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यांनी केले.
संपुर्ण राज्यभरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून पश्चिम बंगालमधील संदेशखली येथील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर नाक्यावर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या क्लिनचीट मुळेच मंत्रिपद व आगामी लोकसभेचे तिकिट मिळाले आहे. या प्रकरणातील मंत्री राठोड यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत, त्या केवळ ठाकरेंमुळे मिळतात.
दरम्यान, कराड येथील कोल्हापूर नाका येथे सकाळी 10 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजप महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी भाजप चित्रा वाघ घोषणा देण्यासाठी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर उतरल्या. तेव्हा निषेधाचे बॅंनर दिसले नाहीत. त्यावर बॅंनर कुठे आहेत, असे प्रदेश कार्यकारणीतील महिलेस विचारले असता त्या गोंधळून गेल्या. मोर्चात बॅनर दिसत नसल्याने चित्रा वाघ चांगल्याच चिडल्या. अन् बॅनर, बॅनर म्हणत रस्त्याशेजारीच त्यांनी एका कट्ट्यावर ठिय्या मारला. तेथे कार्यकर्त्यांशी बातचीत करेपर्यंत काही वेळात बॅनर आणण्यात आले. त्यांनतर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाला सातारा जिल्ह्यातून महिला पदाधिकारी आल्या होत्या. यामध्ये नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या रहिमतपूरच्या चित्राताई कदम, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे यांच्यासह महिलांनी उपस्थिती लावली होती.