प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले
उद्यान विभागाची पाहणी; ऐतिहासिक महत्व टिकविणार
प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले
उद्यान विभागाची पाहणी; ऐतिहासिक महत्व टिकविणार
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणच्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट, हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने, प्रीतिसंगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. प्रीतिसंगम घाट परिसराच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन, या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. याची माहिती घेऊन डॉ. भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे. तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करून, त्यावर लाईट शोच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य असल्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. या परिसराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येतील का, याबद्दल या क्षेत्रातील लोकांशी बोलून सविस्तर विकास आराखडा शासन दरबारी दाखल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीदेखील यावेळी दिली.
दरम्यान, कराडमधील सायकलस्वारांनी कराड ते जगन्नाथपुरी ते पुन्हा कराड असा प्रवास १५ दिवसात सायकलवरून पूर्ण केला. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष दिपक बेलवणकर, तेजस गुरसाळे, अमोल बेलवणकर, वैभव गुरसाळे, उमंग पवार, राजेंद्र भोसले यांचा सहभाग होता. तसेच चिपळूण ते अक्कलकोट व पुन्हा चिपळूण असा ६१० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या ३८ तासांत पूर्ण करून पत्रकार चंद्रजित पाटील व रणजीत शिंदे यांनी अनोखा विक्रम केला आहे. याबद्दल या सर्वांचा डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते रणजित पाटील, कराडचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव डुबल, राजेंद्र डुबल, आशुतोष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चारेगावकर, अभिषेक भोसले, किरण मुळे, नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ए. आर. पवार, वृक्ष अधिकारी मुझफ्फर नदाफ यांच्यासह हास्य क्लब, स्विमिंग क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.