पत्रकारिता आधुनिक झाली, मात्र नाविण्याचा अभाव : सज्जन यादव
कराडमध्ये शब्दसामर्थ्यावर आयोजित कार्यशाळा उत्साहात
पत्रकारिता आधुनिक झाली, मात्र नाविण्याचा अभाव : सज्जन यादव
कराडमध्ये शब्दसामर्थ्यावर आयोजित कार्यशाळा उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पत्रकारांनी केवळ जुंपलेला लेखक होऊ नये. साहित्यिक व पत्रकार यांच्यात एका पावलाचे अंतर असून ते मिटवण्यासाठी पुढे होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात रोज काहीतरी नाविन्य येत गेले. पत्रकारितेत केवळ आधुनिकता आली, मात्र नाविण्याचा अभाव आहे. यासाठी पत्रकारांनी लेखनात भाषाविविधतेचा अवलंब करणे काळाची गरज आहे. शब्दांच्या खोडया कळल्या, की शब्दांया माडया सहज बांधल्या जातात, असे मार्गदर्शन लेखक सज्जन यादव यांनी केले.
येथील कराड नगरपालिका शाळा क्रमांक नऊच्या पी. डी. पाटील सभागृहात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त इंद्रधनू विचारमंच फौंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रभावी पत्रकारितेसाठी शब्दांचे सामर्थ्य’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरिता घारे होत्या. या कार्यशाळेत पत्रकार चंद्रजित पाटील व विश्वास मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
श्री यादव म्हणाले, आधुनिकतेच्या अंगिकारात व अहंकारात आपण आपल्या मायबोलीचे सौंदर्य, सामर्थ्य व महती विसरत चाललो आहोत. कोणतीही भाषा शिकावी लागते. पण मराठी भाषा ही शिकवणारी आहे. हा आपल्या भाषा ज्वलंत असा जिवंतपणा आहे. मराठी भाषेचे वय 1500 वर्षांहून अधिक आहे. पूर्व वैदिक, वैदिक, संस्कृत, पाल, प्राकृत आणि देवनागरी अशी भाषा प्रगत होत गेली. जगात दहाव्या व देशात तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा आहे. ती जागतिक जरी नसली, तरी अगतिक, प्रागतिक आहे. समाजाच्या मानसिक, वैचारिक विकासामध्ये, साहित्यिक, सामाजिक व स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठी भाषेचे योगदान मोठे राहिले आहे. थोर साहित्यिकांनी भाषेचा हा प्राचीन समृद्ध वारसा जपला. पण वाचन संस्कृती लोप होत चालल्यामुळे भाषेच्या या वैभवाचा वारसा जतन करणे कठीण काम बनले आहे. खिन्न व भिन्न समाज यावर साहित्यिकांची भेदक नजर सदैव खिळलेली असते. त्यातून अनेक विकल्प मिळतात आणि साहित्य निर्मितीचे प्रकल्प आणि संकल्प पुरे होत असतात.
देवदास मुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात शब्दांना अतिशय महत्व आहे. भाषा ही संवादाचे साधन मानली जाते. बातमी लिहताना ती साध्या, वाचकांना चटकन समजेल अशा शब्दांत लिहावी. मात्र अवांतर लिखाण, स्तंभ लिखाणात आपल्या शब्द सामर्थ्याचा कस लागतो. आज तर इलेक्ट्रिक, डिजिटल व सोशल असा माध्यमांचा विस्तार झाला आहे. अशा परिस्थितीत आपले लेखनकौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अमर्याद संधी उपलब्ध झाल्या असताना चपखल भाषेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे.
सरिता घारे, सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद सुकरे यांनी कविता सादर केली. शाळा क्रमांक नऊच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी शशिकांत पाटील, सतीश मोरे, प्रमोद सुकरे, सागर बर्गे, मुख्याध्यापक अरविंद पाटील, राहुल पुरोहित, विकास भोसले, विशाल देशपांडे यांनी प्रतिमा व ग्रंथ पूजन केले. अशोक मोहने यांनी प्रास्ताविक, प्रमोद तोडकर यांनी सूत्रसंचालन, माणिक डोंगरे यांनी आभार मानले.