ब्राहमण समाजाला धमकी देणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करा
कराड तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांची मागणी; पोलीस उपअधीक्षकांना निवेदन
ब्राहमण समाजाला धमकी देणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करा
कराड तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांची मागणी; पोलीस उपअधीक्षकांना निवेदन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
एका युट्युब चॅनेलवर मराठा आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर व्हिडिओमध्ये एका अज्ञात इसमाने अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू, असे आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे समाजास भीतीदायक वातावरण व अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र रचले आहे. यामुळे यासाठी संबंधित समाजकंटक व यातील सर्व आरोपींचा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर व कराड तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन गुरुवारी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना देण्यात आले. यावेळी सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिले आहे.
याप्रसंगी जयंत बेडेकर, ओंकार आपटे, अमृत देशपांडे, मकरंद राजहंस, सुहास इनामदार, दिलीप रामदासी, सुधीर एकांडे, सुरेंद्र काळे, शेखर देशपांडे, डॉ. मिलिंद पेंढारकर, दीपक पेंढारकर, अॅड. अरविंद घाटे, अॅड. मिलिंद कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी यांच्यासह समाजातील 250 ते 300 नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडिया युट्युब चॅनेल पाहत असताना एका चॅनेलवर मराठा आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर व्हिडिओमध्ये एक अज्ञात इसम अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू, असे आक्षेपार्ह विधान करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच समाजास भीतीदायक वातावरण व अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र रचले असल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केलेला नाही. परंतु, सदर इसम जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाची बदनामी करत आहे. यामुळे सदर इसमाविरोधात गुन्हा नोंद करून सदर षड़यंत्राचा, तसेच यामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घ्यावा व या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर, सचिव ओंकार आपटे यांच्यासह चित्पावन ब्राह्मण संघ कराड, बहुभाषिक ब्राह्मण संघ कराड व आगाशिवनगर, वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ, कराड, ऋग्वेद स्वाहाकार समिती कराड, ब्राह्मण बहुद्देशीय चॅरिटेबल फौंडेशन कराड, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कराड यांच्यासह कराड तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांनी दिले आहे.