यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाण ही वैचारिक परंपरा जपूया : मनोहर शिंदे
यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाण ही वैचारिक परंपरा जपूया : मनोहर शिंदे
गोळेश्वरच्या गोदावरीनगर कॉलनीत रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
केंद्र आणि राज्यातील सरकारचे विकासाकडे लक्ष नाही. पक्ष व नेते फोडण्याच्या नादात विकासाचा विचार करण्यासाठी त्यांना वेळ नाही. या परिस्थितीचे महिलांनी अवलोकन करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्याला वेगळा वैचारिक वारसा आहे. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील विकास तुम्ही बघितला आहे. त्यामुळे त्यांचे विचार व विकासाची पाठराखण करणे गरजेचे आहे, असे मत कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केले.
गोळेश्वर, ता. कराड येथील गोदावरीनगर कॉलनीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इंद्रजित चव्हाण, महादेव शिंदे, सचिन पाटील, शिवाजी जाधव, महादेव जाधव, सहदेव झिमरे, बळवंतराव जाधव, संजय जाधव, सचिव सुरेश जाधव, भिमराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोहर शिंदे म्हणाले, कराड शहरालगतचा ग्रामीण भाग झपाट्याने वाढत आहे. शहर व त्याभोवतीचा ग्रामीण भाग एकत्र असल्यास त्यास नगरविकास खात्यातून कोट्यवधीचा वेगळा निधी मिळतो. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे या ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे या भागात त्यांनी कोट्यवधीचा निधी दिला आहे. अजूनही विकासासाठी निधी कमी पडणार नाही.
ते म्हणाले, इतरांचे पक्ष फोडायचे एकमेव उद्देश ठेवून चाललेले सरकार विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. लोकशाही प्रक्रियेत महिलांची अर्धी शक्ती आहे. त्यांनी सद्य परिस्थितीचे अवलोकन केले पाहिजे. वैचारिक परंपरा असलेला सातारा जिल्हा व कराड तालुका आहे, हे जपले पाहिजे.
इंद्रजित चव्हाण म्हणाले, शहरालगत ग्रामीण भागात नागरीकरण वेगाने वाढत आहे. नागरीकरण वाढल्याने तितक्याच समस्या वाढत आहेत. या भागाच्या विकासासाठी पृथ्वीराज बाबांचे विशेष लक्ष असून निधी देण्यासाठी त्यांचे प्राधान्य आहे. निधीतून होणाऱ्या सुविधांचा राहणीमान सुधारण्यासाठी फायदा होईल. जनतेने पृथ्वीराजबाबांची पाठराखण करावी.
राजेंद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कॉलनीच्या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्यानिमित्त येथील रहिवासी मुकेश मोहिते यांचा कॉलनीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महादेव जाधव, रघुनाथ वाघमोडे, संदीप पाटील, श्री. कुंभार, धनंजय पवार, संतोष जगताप, संपतराव ठावरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र कांबळे यांनी आभार मानले.