जीवनशैली

महाराष्ट्रातील सहकाराला नवी दिशा देणे गरजेचे: अशोकराव थोरात

29 जानेवारीला कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी सहकार परिषद

महाराष्ट्रातील सहकाराला नवी दिशा देणे गरजेचे: अशोकराव थोरात
29 जानेवारीला कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी सहकार परिषद
कराड, दि. 24 (प्रतिनिधी) –
गेल्या पंधरा ते वीस वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सर्व अर्थाने मागे पडते असून अधोगतीकडे चालले आहे. सहकारातील होणारी ही घसरण रोखण्याचा प्रयत्न गतवर्षी मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंचने सहकार परिषद आयोजित केली होती. तो यशस्वी झाला असून त्यातून सहकार क्षेत्रातील तरुणांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. ही बाब विचारात घेऊन सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या अनुषंगाने कराडला 29 जानेवारीला पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी सहकार परिषद घेणार असल्याची माहिती शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिली.
सोमवार, दि. 29 जानेवारी रोजी कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या सहकार परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. थोरात म्हणाले, भारतातील ग्रामीण भाग व शेती क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने सन 1904 मध्ये ब्रिटीशांनी केलेल्या सहकार कायद्याच्या माध्यमातून सहकार चळवळ सुरु झाली. महाराष्ट्रात 160 च्या सहकार कायद्यामुळे शेती, उद्योग, रोजगार क्षेत्राच्या वाढीस व विकासास चालना मिळून ग्रामीण व शहरी भागाचा विकास झाला. हे मान्य असले, तरी स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात या चळवळीचा सर्वत्र पुरेसा विकास होऊ शकला नाही. लोकशाही कारभाराचे तत्व असणारा सहकार जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात पुरेसा रुजला नाही. भांडवलशाहीतील शोषण व पिळवणूकीच्या विरोधात उभी राहिलेली ही चळवळ 1991 च्या नवीन आर्थिक धोरणातील खाजगीकरणामुळे गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. सहकारात घुसखोरी केलेल्या राजकारण, घराणेशाही व स्वार्थी वृत्तीने सहकाराचे लचके तोडले जात आहेत. अशा सहकार क्षेत्राची वास्तव वस्तुस्थिती व भविष्याबाबत परखड विचार विनिमय करून सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर सहकार परिषदेचा केंद्राचा सहकार कायदा व त्याचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवरील परिणाम अभ्यासणे, सहकार क्षेत्राच्या सध्य परिस्थितीची चर्चा करणे, सहकार क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार करणे, सहकार वृद्धिंगत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांवर चर्चा, सहकार क्षेत्र व कायद्यातील बदलामुळे सहकारी संस्थांपुढे निर्माण होणाऱ्या आव्हानावर चर्चा, प्रबोधन व जागृती निर्माण करणे, बदललेल्या कायद्यांची माहिती देवून चर्चा करणे हा उद्देश आहे. या सहकार परिषदेस सहकार वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणारे सहकार क्षेत्रातील सभासद, प्रतिनिधी, विद्यार्थी, तरुण, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, शासकीय अधिकारी, तसेच सहकार समाजसेवा करणारे समाजातील सर्व घटक उपस्थित राहू शकतात.
सहकार क्षेत्रासाठी तज्ञ मनुष्यबळ व कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अर्थशास्त्र व सहकार विषयाचे प्राध्यापक करतात. यासाठी ही परिषद प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. मळाई ग्रुपमधील सर्व सहकारी संस्था व कराड अर्बन बँकेचे सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ही परिषद नक्कीच सहकार क्षेत्राला उभारी देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »