आप्पासाहेबांचे कृषीप्रधान मॉडेल शेतकऱ्यांसाठी वरदान : सतीश खाडे
आप्पासाहेबांचे कृषीप्रधान मॉडेल शेतकऱ्यांसाठी वरदान : सतीश खाडे
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
गेल्या ६०-७० वर्षांत कृष्णाकाठावरील माणसांसाठी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेबांनी) निर्माण केलेले कृषिप्रधान मॉडेल आज येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ सतीश खाडे यांनी काढले. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवातील कृषीविषयक चर्चासत्रात ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री. खाडे म्हणाले,प्रीतिसंगमावरील पाणी व्यवस्थापनावरील चर्चासत्र हे राज्यासह संपूर्ण देशाला दिशा देणारे ठरेल. सर्वसामान्य शेतकरी प्रत्येक पिकाच्या हेक्टरी उत्पादनावर आपली प्रगती मोजतो. पाण्याचेही तसेच आहे. सध्या भूगर्भातील पाणी आपण संपवले असून पूर्वी २० फुटांवर लागणारे पाणी २०० ते आता जवळपास १६०० फुटांपर्यंत खालावले आहे. तसेच जमिनीवरील पाणी आपण प्रदूषित केले असून, आकाशातील पाणीही ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनिश्चित झाले आहे. जगाची लोकसंख्या तिप्पट झाली असून पाण्याचा जवळपास १८ पट वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे पिकांची पाण्याची गरज, वातावरण, जमिनीचा पोत, जमिनीखालील खडक याचा अभ्यास करून पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
बेंगलोरच्या इकोवा (ICCA) कंपनीचे मनोज मेनन म्हणाले, सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली असून जीवामृत व बिजामृत तयार करून शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा. देशात सेंद्रिय क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले, संपूर्ण देशात ३० लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहेत. पश्चिम महाराष्ट्र उसाची राजधानी असून येथे फक्त ऊस नव्हे; तर तांदूळ, ज्वारी, बाजरी आदी. पिकांचेही चांगले उत्पन्न घेतले जाते. विविध पिकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून अशाप्रकारच्या पिकांचे उत्पादन घेऊन जगभरात निर्यात करणारा भारत प्रमुख देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ऑस्ट्रेलियाच्या प्लॅन फार्म कंपनीचे एरीक हॉल म्हणाले, जगाला आज सेंद्रिय व शाश्वत शेतीची गरज आहे. आत्ताची माणसाची गरज भागवून पुढच्या पिढ्यांना आपण सुपीक शेती हस्तांतरित करायला हवी, ही खरी शाश्वतत आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी किती पाण्यावर किती अन्नधान्य उगवता येईल, मातीची सुपीकता कशी टिकवता येईल, नवे तंत्रज्ञान कसे अंमलात आणता येईल, शेती व्यवस्थानाकडे कस लक्ष देता येईल, ज्यातून पर्यावरण व मातीचे कोणते नुकसान होणार नाही आदींमधूनच शाश्वतत टिकून राहील. तसेच पर्यावरणातील बदलानुसार शेतीमध्येही आवश्यक बदल करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दुसऱ्या सत्रात ‘दुग्ध व्यवसाय : भविष्यातील एक नवी दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना चिखली, ता. कागल जि. कोल्हापूर येथील वाय. टी. पाटील डेअरी फार्मचे अरविंद पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसाय हा सर्व वयोगटातील लोकांनी करण्यासारखा व्यवसाय आहे. परंतु, अलीकडे दुग्ध व्यवसाय तोट्यात असल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे. मात्र, शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध व्यवस्थापन हा दूध व्यवसायाचा मूलमंत्र असून पारंपारिक व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना शाश्वत समृद्धी व भरभराट मिळवून देऊ शकतो, असे मतही अरविंद पाटील यांनी व्यक्त केले.