‘टिळक’ विद्यार्थ्यांच्या भावी कारकिर्दीची पायाभरणी करणारी शाळा
अरुण जोशी; टिळक हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण, प्रेरणा पुरस्कार प्रदान
कराड : ग्राम दौलत-
टिळक हायस्कूल ही विद्यार्थ्यांच्या भावी कारकिर्दीची पायाभरणी करणारी शाळा आहे, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध अभियंता व टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी अरुण जोशी यांनी केले.
येथील टिळक हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी होते. यावेळी सचिव चंद्रशेखर देशपांडे, सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, उपाध्यक्ष प्रबोध पुरोहित, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, उपमुख्यध्यापक किसन वाघमारे, शरद शिंदे, संजय बाबर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक गोकुळ अहिरे यांनी केले. चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रेरणा पुरस्कारच्या मानपत्राचे वाचन उपमुख्यध्यापक किसन वाघमारे यांनी केले. अरुण दत्तात्रय जोशी यांना शाळेतर्फे दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बाळासाहेब कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघातर्फे आजी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या विविध परितोषिकांचे वितरण संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर व उपाध्यक्ष प्रबोध पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध परितोषिकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन जीवन थोरात, कार्याध्यक्ष जालिंदर पवार यांनी आभार मानले.