दिव्यांगांना नववर्षात पेंशन वाढीची भेट मलकापूर नगरपालिकेचा निर्णय; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वितरण
दिव्यांगांना नववर्षात पेंशन वाढीची भेट
मलकापूर नगरपालिकेचा निर्णय; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वितरण
कराड : ग्राम दौलत –
येथील मलकापूर नगरपालिकेने शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी सन 2018 सालापासून महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना सुरु केली असून, महाराष्ट्रात अशा प्रकारची दिव्यांग व्यक्तींना मासिक पेंशन देणारी एकमेव पालिका आहे. आता 2024 या नवीन वर्षात पालिकेने दिव्यांग व्यक्तींना पेंशन वाढ देत नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एका कार्यक्रमात सदर पेन्शन वाढीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरुपात दिव्यांग बांधवांना वितरीत करण्यात आला.
मलकापूर नगरपालिकेने शहरातील दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे करुन दिव्यांगत्वाच्या आधारे मासिक पेंशन योजना प्रति महिना संबंधित व्यक्तींच्या खात्यावर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबर जमा केली जाते. यापुर्वी पालिकेने मासिक पेंशन बरोबरच शहरातील दिव्यांग महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी घरघंठी, शिलाई व पिकोफॉल मशिन आदी. साहित्यांचे वितरण केले होते. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन औषधांसाठी येणाऱ्या खर्चाचा व त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करून मलकापूर नगरपालिकेने पाच टक्के दिव्यांग राखीव निधी अंतर्गत मलकापूर शहरातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांग टक्केवारीनुसार महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना कार्यरत ठेवली आहे. या योजनेअंतर्गत 40 ते 79 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थीना मासिक 700 रुपये व 80 ते 100 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये मासिक पेंशन व पुर्णपणे बेडरेस्टवर असणाऱ्या व त्यांची सुश्रूषा करावी लागते, अशा व्यक्तींना एक हजार रुपये, स्व.स्वा.सै. भास्करराव शिंदे विद्यावेतन योजनेअंतर्गत शिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एक हजार रुपये पेंशन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शहरातील एकूण 127 लाभार्थ्यांना प्रति महिना 1,04,800 रुपये पेंशनसाठी खर्च केला जातो.
दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा विचार करता दिव्यांग व्यक्तींच्या मासिक पेंशन योजनेमध्ये वाढ करण्याबाबत मलकापूर पालिकेने निर्णय घेवून त्यास 31 नोव्हेंबर 2023 रोजीच्या मासिक सभेत एक मताने मान्यता देण्यात आली. त्यानुसार दिव्यांगांच्या मासिक पेंशनमध्ये पुढीलप्रमाणे वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 40 ते 79 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक 300 रुपयांची वाढ करून एक हजार रुपये, 80 ते 100 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थीना 500 रुपये वाढ करून एकूण 1,500 मासिक पेंशन, तसेच स्व.स्वा.सै. भास्करराव शिंदे विद्यावेतन योजनेअंतर्गत प्रत्यक्ष शाळेमध्ये जावून शिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना 500 रुपये वाढ करून एकूण 1,500, पुर्णपणे बेडरेस्टवर असलेल्या व सुश्रूषा करावी लागणाऱ्या व्यक्तींना एक हजार रुपयांची वाढ करून एकूण दोन हजार रुपयांची पेंशनमध्ये वाढ करुन ती 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पालिकेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. यामुळे दिव्यांगांना जगण्याची व शिक्षण घेण्याची उर्जा निर्माण होण्यासाठी शहरातील दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण समिती सभापती कमल कुराडे, उपसभापती नंदा भोसले, मुख्याधिकारी प्रताप कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे आभार व्यक्त केले आहेत.