चचेगावला नागरी सुविधांसाठी भरघोस निधी मिळवून देणार : डॉ. अतुलबाबा भोसले
चचेगावला नागरी सुविधांसाठी भरघोस निधी मिळवून देणार : डॉ. अतुलबाबा भोसले
कराड : ग्राम दौलत
मलकापूरलगत असलेले चचेगाव हे भविष्यात उपनगर म्हणून उदयास येऊ शकते. त्यामुळे भविष्याचा विचार करुन, या गावात अधिकाधिक नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी येत्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या २५-१५ ग्रामविकास कार्यक्रम योजनेतून कराड दक्षिण मतदारसंघातील चचेगाव (ता. कराड) येथे रस्ता सुधारणेच्या कामासाठी डॉ. भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सरपंच महेश पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश पवार, पोलिस पाटील प्रशांत पवार, चंद्रकांत पवार, कृष्णा बँकेचे माजी संचालक तातोबा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की चचेगावसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोळे पाणंद रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी, चचेगाव ते कृष्णा व्हॅली रस्त्यासाठी ३ कोटींचा निधी, तसेच जि.प. शाळा खोल्यांसाठी ४५ लाख, गटर दुरुस्तीसाठी ५ लाख व ज्या रस्त्याचे आत्ता भूमिपूजन झाले; त्यासाठी १० लाख असा निधी प्राप्त झाला आहे. या सर्व कामांना लवकरच प्रारंभ होणार असून, यामुळे चचेगावच्या विकासात भर पडणार आहे. येत्या काळातही चचेगावसाठी शासनाच्या माध्यमातून मागाल तितका निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून, गावातील तरुणांसाठी कौशल्य विकास प्रकल्प उभारण्याचा माझा मानस आहे.
चंद्रकांत पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. तानाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले. यावेळी रमेश पवार, साहेबराव पवार, योगेश पवार, हिम्मत पवार, अशोक पवार, प्रसन्न पवार, सुनील थोरात, श्रीकांत औताडे, धीरज आडसुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.