जीवनविद्या मिशनचा कराडला समाजप्रबोधन महोत्सव
‘सदगुरु श्री वामनराव पै’ जन्मशताब्दी निमित्त 7 जानेवारीला आयोजन; विचार प्रदूषण कमी करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन
कराड : ग्राम दौलत –
थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सदगुरू वामनराव पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित ‘जीवन विद्या मिशन’ या शैक्षणिक, सेवाभावी, सामाजिक संस्थेतर्फे कराडमध्ये भव्य समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 7 जानेवारी 2024 रोजी सायं. 4.30 ते 8 या वेळेत येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोत्रे, गिरीश सुकाळे, दिलीप महाजन, दीपक कदम यांनी दिली.
जीवन विद्या मिशनच्या समाजप्रबोधन महोत्सवाची माहिती देण्यासाठी कराड येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
विश्वस्त संतोष तोत्रे म्हणाले, या कार्यक्रमात जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त, जेष्ठ प्रबोधक, युथ मेन्टॉर, लाईफ ट्रान्सफॉरमेशन तज्ज, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘आनंदाचे देणे’ या विषयावर व्याख्यान होणार असून ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ आणि संगीत जीवनविद्येने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. तसेच हजारो लोकांच्या उपस्थितीत सादर केली जाणारी ‘विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना’ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. सदगुरु श्री वामनराव पै यांनी अखिल विश्वमानवाच्या कल्याणासाठी ही विश्वप्रार्थना निर्माण केली आहे. या विश्वप्रार्थनेत सर्व सकारात्मक आणि सहकारात्मक असे दिव्य विचार आहेत. ज्या विचारांची आज जगाला गरज आहे. विश्वात पसरलेले विचार प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. सदगुरुंच्या जन्मशताब्दीनिमित्त जीवनविद्या मिशनने ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ हा संकल्प केला आहे. तसेच संस्था या निमित्ताने ‘विश्वप्रार्थना घरोघरी’ हा उपक्रम राबवत आहे. या विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून जगभरात दिव्य विचार प्रसारित करण्याचा आणि विश्वशांतीसाठी प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे. या संकल्पपूर्तीसाठी कराडमध्ये या भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जन्मशताब्दी महोत्सवाचे हे तिसरे पुष्प आहे. यापूर्वी नागपूर आणि मुंबईत दोन भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. आता कराडमधूनही हजारोंच्या संख्येने नागरिक विश्वप्रार्थना जपयज्ञात सहभागी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीत विश्वप्रार्थनेच्या जयघोषात कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणार असून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही जीवन विद्या मिशनतर्फे विश्वस्त संतोष तोत्रे, गिरीश सुकाळे, दिलीप महाजन, दीपक कदम यांनी केले आहे.