‘कृष्णा’च्या विद्यार्थ्यांनी भरविला आनंद बाजार
कृष्णा स्कूलच्या प्रांगणात आयोजन; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड: प्रतिनिधी –
लहान मुलांना एरव्ही बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध कमी असतो. परंतु हाच अनुभव कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कोयना वसाहत (ता. कराड) येथील के.सी. टी. कृष्णा स्कूलतर्फे आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका टी. ए. महाते, स्काऊट गाईड विभागाचे प्रमुख पी. डी. गुजर, पी. पी. कदम यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
या आनंद बाजाराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बाजारातून होणारी आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. यावेळी मुला- मुलींनी विविध फूड स्टॉल, मनोरंजन खेळांचे स्टॉल आदी स्टॉल शाळेच्या आवारात उभारले होते. बाजारातून होणारी पैशांची देवाण-घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबरच, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला. शाळेतच बाजार आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि उत्साह होता. तर पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या बाजाराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.