आरोग्यशिक्षण

फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध : डॉ. अनिल घुले

फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध : डॉ. अनिल घुले
कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय परिषद उत्साहात; ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क
संपूर्ण जगात फार्मसी इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी विभागाचे माजी संचालक डॉ. अनिल घुले यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या फार्मसी अधिविभागातर्फे आयोजित ‘फार्मा क्षेत्रातील परदेशातील संधी’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे होते.
व्यासपीठावर श्री महालक्ष्मी अकॅडमीचे संचालक अभय केळकर, युरोप एज्युबोर्ड एज्युकेशन व करियर गायडन्स केंद्राचे समुपदेशक राहुल नाईक, कृष्णा विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एस. आर. पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडी विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. एन. आर. जाधव, डॉ. अक्षदा कोपर्डे होत्या.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. घुले म्हणाले, फार्मसी क्षेत्रात सातत्याने नवनवे संशोधन होत आहे. हे क्षेत्र नव्या टॅलेंटच्या शोधात असून, या संधीचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवी कौशल्ये आत्मसात करावीत. परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध असून, तिथे त्यासाठी शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चे ध्येय्य निश्चित करुन वाटचाल केल्यास यश हमखास प्राप्त होऊ शकते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलसचिव डॉ. घोरपडे म्हणाले, कृष्णा विद्यापीठाने २०१७ पासून फार्मसी अधिविभाग सुरु केला. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या अधिविभागाने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेत, नवनवे अभ्यासक्रम सुरु केले असून, याला विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. या विद्यापीठातील अनेक विद्यार्थी परदेशातही सेवा बजावित आहेत. विद्यार्थ्यांनी परदेशात मिळालेल्या अनुभवाचा लाभ घेऊन, भारताला बलशाली बनविण्यात योगदान द्यावे.
यावेळी फार्मसी अधिविभागाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या फार्मा प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परिषदेत ८०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्तविक केले. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अक्षदा कोपर्डे यांनी आभार मानले. यावेळी दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, कृष्णा फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील, प्राचार्य डॉ. रोहित भोसले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »