श्रीरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन ट्रस्ट आणि निळेश्वर माध्यमिक विद्यालय,वडोली निळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरत्न अवॉर्ड्स 2023 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
कराड : प्रतिनिधी-
मा.यशवंतराव चव्हाण साहेब व मा.श्रीरंग लक्ष्मण पवार (दुकानदार) यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराडचे सुप्रसिद्ध हृदय व छाती रोग तज्ञ डॉक्टर संजय पवार तसेच प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अनिल लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सध्याचे युग व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या आहारी गेले आहे, जे भविष्यात फार घातक ठरणार आहे. आजच्या युवा पिढीची शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक वाढ होण्यास घातक ठरत आहे, याची खंत डॉक्टर संजय पवार यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या भाषणातून व्यक्त केली. कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त वापर हे चुकीचे असते. मुले हे आपल्या देशाचे येऊ घातलेले सुजाण नागरिक आहेत. त्यांच्या भविष्यासाठी वाचन कला ही जोपासली गेली पाहिजे, त्याचप्रमाणे चांगले ऐकण्यासाठी नवनवीन विषयांवर व्याख्यानमाला आयोजित केल्या गेल्या पाहिजेत असे सुचवले. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता, त्यासाठी योग्य शिक्षण व मार्गदर्शनाची साथ मिळणे गरजेचे असते. निळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नलावडे सर यांनी शाळेत नवनवीन उपक्रम सुरू केले याबद्दल त्यांचे विशेष कौतुक व आभार मानले. सकस सात्विक आहार व उत्तम आरोग्य याविषयी बोलताना डॉक्टर अनिल लाहोटी सर सांगतात सकस व परिपूर्ण आहार मुलांनी घेतला पाहिजे. प्रामुख्याने बेकरी प्रॉडक्ट व जंक फूड यांचा वापर टाळावा. आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी प्रकर्षाने साखरेचे अतिसेवन त्याचप्रमाणे पाम तेल याचा वापर कमी करावा. शक्य असेल तर टाळावा. मुलांना मोबाईल फोन पासून परावृत्त करावे, कारण त्यातून येणाऱ्या किरणांपासून त्यांच्या बौद्धिक वाढीस आळा बसतो. आहारात आपले महाराष्ट्रीयन जेवण हे अति उत्तम आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी तसेच मोड आलेले कडधान्य यांचा आहारात समावेश करावा. आहारात दुग्धजन्य पदार्थांचे म्हणजे दूध, दही, तूप यांचे सेवन करणे आवश्यक आहे. तुपामुळे बुद्धीस चालना मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारतातील युवक कुठल्याही क्षेत्रात मागे पडत नाहीत. जीवनसत्व, प्रथिने कार्बोहायड्रस यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यावश्यक आहे. रोज एखादे फळ हे खाल्लेच पाहिजे, उदाहरणार्थ सफरचंद, पपई, केळी, पेरू यांसारखी फळे नेहमी खाण्यात असावी. रक्तातील पेशी व प्लेटलेट यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी उपयोग होतो. सकस, संतुलित आहार व योग्य प्रमाणात पाणी यांचा समावेश आपल्या जेवणात असेल तर शरीर नावाचे यंत्र आपणास त्रास देणार नाही. आहाराबरोबर झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व गोष्टींची योग्य सांगड घातली तर तुम्ही आयुष्यात कधीही मागे पडणार नाही. सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुनंदा पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांनी शिक्षणाबरोबर कला व क्रीडा क्षेत्राही सहभाग घेऊन आपले वर्चस्व गाजवावे त्यामुळे सर्वांगीण विकास होणार आहे. मुलांना वेळोवेळी या गोष्टींसाठी प्रोत्साहन देत असणाऱ्या श्री नलवडे सर व इतर शिक्षक वर्ग यांचे अभिनंदन केले श्रीरत्न अवॉर्ड्स 2023 या कार्यक्रमास निळेश्वर माध्यमिक विद्यालय वडोली निळेश्वर यांचे सर्व शिक्षक वर्ग, जिल्हा परिषद शाळा बवडोली निळेश्वर यांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद शाळा माणिक नगर यांचे मुख्याध्यापक हजर होते. या कार्यक्रमात वरील तिन्ही शाळांमधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप व एन. एम. एम. एस. या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.