‘कृष्णा’ ही नर्सिंगचे सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था : डॉ. नीलिमा सोनवणे
कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात
कराड : प्रतिनिधी –
कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनी देश-विदेशात वैद्यकीय क्षेत्रासह शासकीय व उच्च शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. ‘कृष्णा’ ही नर्सिंगचे सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. नीलिमा सोनवणे यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नर्सिंग अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणूत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे होते.
व्यासपीठावर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, ‘नर्सिंग’च्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, चीफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कृष्णा विद्यापीठात जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी अभ्यासक्रमाच्या ४१ व्या बॅचच्या आणि बी.एस्सी. नर्सिंगच्या १८ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. सोनवणे म्हणाल्या, रुग्णालय हे मंदिर असून, तिथे दाखल होणारा पेशंट हा परमेश्वर आहे, असे समजून नर्सेसनी रुग्णांची सेवा करावी. नर्सिंग हे सेवेचे व्रत असून, या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तींना समाजाकडून मोठी प्रतिष्ठा लाभते. नर्सिंग व्यवसायात रोजगाराच्या अनेक संधी असून, नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्याय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असण्याचा अभिमान बाळगावा.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलसचिव डॉ. घोरपडे म्हणाले, की १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना झाली. नर्सिंगचे शिक्षण देणारी ही भारतातील एक महत्वपूर्ण संस्था आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मिळत असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे, इथल्या विद्यार्थ्यांना जगभरात मोठी मागणी आहे. विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देतानाच, संशोधनाच्या क्षेत्रातही करियर करावे.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. प्रा. डॉ. शिवाजी पवार यांनी आभार मानले.