कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय दंतविज्ञान विद्यार्थी परिषदेला उत्साहात प्रारंभ
देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थी – संशोधकांचा सहभाग
कराड : प्रतिनिधी –
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दंतविज्ञान अधिविभागातर्फे आयोजित २ ऱ्या राष्ट्रीय दंतविज्ञान विद्यार्थी परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला. इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थी – संशोधक सहभागी झाले आहेत.
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, महाराष्ट्र डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जोशी, डॉ. बजरंग शिंदे, डॉ. मानसिंग पवार, ‘दंतविज्ञान’चे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी. उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, आज जगभरात दंतचिकित्सकांना मोठी मागणी आहे. अशावेळी दंतचिकित्सकांनी सातत्याने आपल्यातील कौशल्ये विकसित करणे व ज्ञानकक्षा वृद्धींगत करणे गरजेचे आहे. जगात सर्वश्रेष्ठ असे दंतवैद्यकीय मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत नवसंकल्पनांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे.
कुलगुरु डॉ. मिश्रा म्हणाल्या, जगात गुणवत्ताकेंद्रित शिक्षणाला महत्व असून, ही गुणवत्ता जपण्याचे काम कृष्णा विश्व विद्यापीठाने कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. जागतिक पातळीवर दंतविज्ञान शिक्षणात अनेक बदल होत असून, या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अशा परिषदांचे विशेष महत्व आहे.
दंतचिकित्सकांनी पर्यावरणाचे भान ठेऊन शाश्वत दंतचिकित्सेचा पुरस्कार करावा, असे आवाहन डॉ. संजय जोशी यांनी केले. यावेळी डॉ. बजरंग शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ. ऋषीकेश महापराळे यांनी स्वागत केले. डॉ. शशिकिरण यांनी प्रास्तविक केले. एकता लाहोटी व अनुष्का काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमित जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा विश्व विद्यापीठाच्या इनोव्हेशन ॲन्ड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल, ‘नर्सिंग’च्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, ‘फार्मसी’चे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, डॉ. सुरेखा भेडसगावकर, डॉ. सिद्धार्थ वर्मा, इंडियन डेंटल असोसिएशनच्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. संदीप काशीद यांच्यासह डॉक्टर्स, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.