आरक्षणाच्या जयघोषाने दणाणले कराड
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भगवे वादळ; हजारोंची गर्दी
आरक्षणाच्या जयघोषाने दणाणले कराड
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भगवे वादळ; हजारोंची गर्दी
कराड : प्रतिनिधी –
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या कराडमधील नियोजित सभेस वेळ होणार असला तरी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ असा जयघोष करत मराठा समाजबांधवांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम दणाणून सोडले होते.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी १५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सभा आटोपल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मनोज जरांगे-पाटील यांची कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सभा होणार होती. सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या सभेस उपस्थित राहण्यासाठी कराड व पाटण तालुक्यांतील हजारो मराठा समाज बांधव सायंकाळी सहा वाजल्यापासून स्टेडियमच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे पाहावयास मिळत होते. कराड व पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे कराडकडे येणाऱ्या मार्गावर पाहावयास मिळत होते. स्टेडियमवर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून या व्यासपीठापुढे मराठा बांधवांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा सभा सुरू होणार असली तरी कराड व पाटण तालुक्यातील महिला भगिनींनी गर्दी केल्याचेही पहावयास मिळाले. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे… नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं आरक्षण देत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे असा जयघोष करत मराठा समाज बांधवांनी स्टेडियम परिसर दणाणून सोडला होता.