उपजिल्हा रुग्णालय प्रश्नी बैठक
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, आयुक्त व संचालक स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन
कराड : प्रतिनिधी –
कराडच्या उपजिल्हा रूग्णालयातील अस्वच्छता व गैरसोयींबाबत प्रहारच्या वतीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रूग्णालयातील प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य संचालक व आयुक्तांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मनोज माळी यांनी दिली आहे.
उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी, अस्वच्छता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध साठा याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार
पडली. यावेळी आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव, मनोज माळी, जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शेडगे. भानुदास डाईंगडे, प्रणित भिसे, प्रवीण डांगे, सागर डांगे, सागर गावडे आदींची उपस्थिती होती.
मनोज माळी यांनी सांगितले की, उपजिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ, फिजिशियन, सोनोग्राफी रेडोलॉजिस्टिक आदी डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ एनएचएममधून भरण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच तीन ते चार वर्षांपासून स्वच्छतेचे टेंडर काढले नाही. त्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता आहे. याबाबत आरोग्य संचालक पातळीवर पाठपुरावा करून व प्रत्यक्ष भेट घेऊन तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतेचे कंत्राट देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वैद्यकीय अधीक्षकांना सूचना
सहा महिन्यापासून सुरक्षारक्षकांचे पगार थकले आहेत. याबाबतही आयुक्त पातळीवर पाठपुरावा करून तत्काळ सुरक्षा रक्षकांना पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उपजिल्हा रूग्णालयाला पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व रुग्ण व नातेवाईकांशी सौजन्याने वागण्याची समज दिल्याचे मनोज माळी यांनी सांगितले. प्रहारच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या काळात उपजिल्हा रूग्णालयातील प्रश्न सुटले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनोज माळी यांनी दिला आहे.