कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना सातारा भूषण पुरस्कार
कराड:प्रतिनिधी –
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सातारकरांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सातारा रत्न भूषण पुरस्कार प्रदान केला जातो. सन २०२३ साठीचा बँकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना परम पूज्य सेवागिरी महाराज मठ पुसेगावचे मठाधिपती श्रीमंत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रदान केला.
सोमवार दि.२३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट शिवाजी मंदिर सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष राजाराम निकम व सहकारी तसेच सीए. दिलीप गुरव यांच्यासमवेत कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व अध्यक्ष डॉ. सुभाष एरम हे उपस्थित होते.
सीए. दिलीप गुरव सन १९९६ साली कराड अर्बन बँकेच्या सेवेत उपमुख्य कार्यकारी या पदावर रुजू झाले. कार्यतत्परता, अचूक व धाडसी निर्णय, बँकेच्या गुंतवणूक व वित्तपुरवठ्याबाबतचा सूक्ष्म अभ्यास इ. गुणांमुळे सन २००५ साली बँकेने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती दिली. कमी वयात म्हणजेच वयाच्या ४० व्या वर्षी नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी पद सांभाळणारे सीए. दिलीप गुरव हे एकमेव होते. मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार स्वीकारतेवेळी बँकेचा एकूण व्यवसाय रू. ६६० कोटी इतका होता तोच आज सतरा वर्षात रु.४,६०० कोटी इतका झाला आहे. त्यांच्या काळात बँकेने २००७ साली सांगली येथील श्री पार्श्वनाथ सह. बँक तसेच सन २०१७ मध्ये सातारा येथील अजिंक्यतारा सह. बँक व अजिंक्यतारा महिला सह. बँक अशा तीन बँकांचे विलिनीकरण करून घेतले; सहकारातील एक यशस्वी विलिनीकरण म्हणून याकडे पाहिले जाते. कराड अर्बन बँकेने आर्थिक स्थिती भक्कम ठेवतानाच सामाजिक बांधिलकी कृतीतून जपली आहे. सीए. दिलीप गुरव हे अर्बन परिवारातील संलग्र संस्था जसे अर्बन बझार, मूक बधिर शाळा, इ. संस्थांना बहुमोल मार्गदर्शन करीत असतात.
सीए. दिलीप गुरव हे सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना बँकींग विषयी मार्गदर्शन करत असतात. तसेच त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सहकार खाते यांच्याद्वारे आयोजित केल्या जाणान्या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित प्रशिक्षक म्हणून सहभागी बँकांना मार्गदर्शन करत असतात. सीए. दिलीप गुरव यांनी बँकींग क्षेत्रात केलेल्या याच कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सातारा भूषण पुरस्काराबद्दल सीए. दिलीप गुरव यांचे कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, सर्व संचालक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि सेवक यांनी अभिनंदन केले. तसेच बँकेचे सभासद, ग्राहक,हितचिंतक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे अभिनंदन केले.