जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
सातारा:प्रतिनिधी –
जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नवी मुंबईच्या नेरुळ येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर आज नेरुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार आहे.
आध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबामहाराज सातारकर यांचे खरं नाव, निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. विठ्ठलाचे किर्तन आणि ज्ञानेश्वरीचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बाबामहाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रीकपर्यंत शिक्षण घतले होते. बाबामहाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.
बाबा महारांचे किर्तन ऐकण्यासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक गर्दी करायचे. बाबामहाराजांच्या घरात गेल्या तीन पिढ्यापासून किर्तनाचा वारसा जोपासला जातोय. बाबामहाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत वाड्:मयाची आवड होती. बाबामहाराज यांच्या घडण्यामागे चुलते अप्पामहाराज आणि अन्नामहाराज यांचा मोठा वाटा आहे.