स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत व कायम स्वरूपी वैदयकीय अधीक्षकांची नेमणूक व्हावी : मनोज माळी
कराड : प्रतिनिधी –
स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत व कायम स्वरूपी वैदयकीय अधीक्षकांची नेमणूक व्हावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कराडसह पाटण कडेगाव खटाव इस्लामपूर शिराळा इत्यादी तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. शिवाय पुणे – बेंगलोर आशियाई महामार्ग व गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्ग कराड शहरातुन गेला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णांबरोबरच अपघातात जख्मी होणाऱ्या रुग्णांची संख्या कराडला जास्त आहे.
आरोग्य सेवेच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय महत्वाचे असल्याने शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करून येथे ईमारती व सर्व भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र तज्ञ डॉक्टरांची कमतरता व अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नाहीत. येथे येणाऱ्या रुग्णांना सातारा सिव्हिल हाँस्पिटल अथवा खाजगी रुग्णालयात पाठवावे लागत आहेत.
अनेक वर्षांपासून येथील स्वच्छतेचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे रुग्णालयात स्वच्छतेच्या तीन तेरा वाजल्या आहेत. रुग्णालयात व आवारात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा रुग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकाना स्वच्छ पाणी पिण्यास मिळत नाही तसेच औषध साठा खूपच कमी प्रमाणात आहे, त्यामूळे रुग्णांना औषधे मिळत नाहीत त्यामुळे बाहेरून औषधे घ्यावी लागत आहेत.
वैदयकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश शिंदे निवृत्त झाल्यापासून जवळपास १७ महिन्यापासून हे पद रिक्त आहे. उंडाळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेडगे यांच्या कडे उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र डॉक्टर शेडगे हे जबाबदारी ने काम करत नाहीत केवळ पदभार आहे म्हणून उपजिल्हा रुग्णालयात येऊन बसतात.
याबाबत वैदयकीय अधिक्षक म्हणून डॉक्टर शेडगे यांना विचारणा केली तर ते माझ्याकडे केवळ पदभार आहे माझी नेमणूक उंडाळे ग्रामीण रुग्णालय असल्याचे सांगून उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीची जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत अरेरावची भाषा वापरतात रुग्णांना व नातेवाईक यांना अत्यंत खालच्या भाषेत बोलतात.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाने देशपातळीवर नाव लौकीक मिळवला आहे . मात्र गेली वर्षेभरापासून रुग्णालयांची वाताहत सुरू आहे त्यामुळे डॉक्टर शेडगे यांच्या कडील उपजिल्हा रुग्णालयचा चार्ज तातडीने काढावा व उपजिल्हा रुग्णालयला कायमस्वरूपी वैदयकिय अधीक्षकची नेमणूक करावी. तसेच रुग्णालयातील रिक्त डॉक्टर व कर्मचारी पदे तत्काळ भरावीत. रुग्णालयातील स्वच्छता दैनंदिन करण्यात यावी. दिवाळी १५ दिवसावरती आहे सुरक्षा रक्षक यांचे पगार ५ ते ६ महिन्या पासून थकीत आहेत ते तातडीने द्यावेत, अन्यथा आपल्या कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.