जैवविविधता संवर्धनासाठी वनातील वणवे रोखणे आवश्यक : डॉ. संजय पवार
जैवविविधता संवर्धनासाठी वनातील वणवे रोखणे आवश्यक : डॉ. संजय पवार
कराड : प्रतिनिधी –
पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धनासाठी वनातील वनवे रोखणे ही आवश्यक बाब आहे, असे प्रतिपादन श्वास फाऊंडेशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार यांनी केले.
शिक्षण मंडळ कराड व श्वास फौंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वन वणवे थांबवा’ या तालुका स्तरावरील शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी सचिव चंद्रशेखर देशपांडे, मानद वन्य जीव संरक्षक रोहन भाटे, पालक, निसर्गप्रेम, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. संजय पवार म्हणाले, आपल्या सातारा जिल्ह्याला समृध्द निसर्गाचा वारसा मिळाला आहे. पश्चिम घाटातील कोयना जंगल जैवविविधतेने समृद्ध आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती, कीटक, पशुपक्षी व सूक्ष्मजीव या वनात राहतात. पर्यावरण संतुलनात ते महत्वाची भूमिका बजावतात. परंतु, वनातील वणवे हीच वन संपत्ती नष्ट करतात. यामध्ये अनेक कीटक, सूक्ष्मजंतू, वनस्पती व पशुपक्षी कायमचे नष्ट होतात. म्हणून वन वणवे रोखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा पर्यावरणीय संस्कार शालेय विद्यार्थ्यांच्यावर घडवणे खूप महत्वाचे आहे. शिक्षण मंडळ, कराड यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असते असेही ते पुढे म्हणाले. वन्य जीव संरक्षक रोहन भाटे यांनी जंगल संवर्धनासाठी वाघ किती उपयोग ठरतात तसेच सर्प, पक्षी, पशु यांच्या विविध जाती यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
मकरंद किर्लोस्कर व विद्यार्थ्यांनी निसर्ग गीत सादर केले.
वन वणवा थांबवा या विषयावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणारे मराठी भाषा अध्यापक रघुनाथ घुले, अरविंद महाडिक, चित्रकला अध्यापक सुरेश कांबळे व आबासाहेब पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चित्रकला व निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.