महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात
तीन जण जागीच ठार : पाचवड फाटा गावच्या हद्दीतील घटना
कराड : प्रतिनिधी –
पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड येथे चारचाकीने पाठीमागून उभ्या आयशर ट्रकला भीषण धडक दिली असून यामध्ये बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाला आहे. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पोवार हे कोल्हापूर पोलिस कर्मचारी आहेत. नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती आणि कराड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूरहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेन वरती पाचवड फाटा येथील भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर उभे असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून चार चाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत चार चाकीचा चक्काचूर झाला असून गाडीतील तिघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळतात कराड तालुका पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
अपघातात आयशर ट्रकला क्रमांक (MH -19-cy-5350) पाठीमागून चारचाकी व्हॅगनार क्रमांक (MH-01-AL-5458) अशी वाहने आहेत. व्हॅगनार गाडीतून भाऊ, बहीण आणि भाचा हे तिघेही पुण्याकडे निघालेले होते. नितीन पवार हे आपल्या बहिण आणि भाच्याला सोडण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयकुमार उथळे, डीपी जैन पीआरपी आफिसर दस्तगीर आगा यांच्यासह वाहतूक पोलिसांनी वाहन हटवली.