कराड उत्तरमधील विकासकामांचा लवकरच भूमिपूजन सोहळा : रामकृष्ण वेताळ
कराड: प्रतिनिधी –
कराड उत्तरमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होणार आहेत, अशी माहिती रामकृष्ण वेताळ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिलेली आहे. सुमारे १५ कोटींचा विकास निधी मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत कराड उत्तरेतील विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये. भाजप नेत्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला असल्याने या कामांची भूमिपूजने करण्याचा हक्कही फक्त भाजप नेत्यांनाच आहे, असे रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.
कराड उत्तर मतदारसंघातील सुर्ली पाटी ते कामथी ते पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी गणपती मंदिर ते वीरवडे, करवडी रस्ता, शिवडे ते भवानवाडी रस्ता आणि मरळी ते भगतवाडी रस्ता या रस्त्यांच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी १५ कोटीपेक्षा जास्त निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजूर झालेला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी कराड उत्तर भाजपच्या वतीने आम्ही गिरीश महाजन यांना निवेदन दिले होते. अनेक गावांना स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतही रस्ता झालेला नाही. याबाबतची सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर सांगितली. आमच्या पाठपुराव्यामुळेच या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असल्याने भूमिपूजन करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे.