साखर उद्योगात कृष्णा कारखाना दिशादर्शक : रणजीतभाई पटेल
गुजरातमधील गणदेवी कारखान्याच्या संचालकांची कृष्णा कारखान्यास सदिच्छा भेट
साखर उद्योगात कृष्णा कारखाना दिशादर्शक : रणजीतभाई पटेल
गुजरातमधील गणदेवी कारखान्याच्या संचालकांची कृष्णा कारखान्यास सदिच्छा भेट
कराड : प्रतिनिधी –
महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे योगदान महत्वाचे असून, राज्यातील साखर कारखानदारीसाठी कृष्णा कारखाना दिशादर्शक आहे. कारखान्याची सर्वांगीण प्रगती ही कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार गुजरात राज्यातील गणदेवी येथील सहकारी खांड उद्योग मंडल कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष रणजीतभाई पटेल यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.
गुजरात राज्यातील गणदेवी येथील सहकारी खांड उद्योग मंडल कारखान्याच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने कृष्णा कारखान्यास भेट दिली. यामध्ये कार्यकारी अध्यक्ष रणजीतभाई पटेल, माजी अध्यक्ष व संचालक कांतीभाई पटेल, गणपतसिंह चव्हाण, वीरेंद्रभाई पटेल, नटूभाई पटेल यांचा सहभाग होता. या शिष्टमंडळाने कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची भेट घेऊन, साखर उद्योगासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, कारखाना आधुनिकीकरण, मोफत घरपोच साखर, जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी १०० टन उत्पादन वाढ योजनेची माहिती शिष्टमंडळास दिली. कृष्णा कारखान्याने अल्पावधीत आधुनिकीकरणाचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल शिष्टमंडळाने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे विशेष कौतुक केले.
कारखान्याच्या विविध प्रकल्पांच्या भेटीनंतर गणदेवी कारखान्याच्या संचालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.