‘कृष्णा नर्सिंग’च्या ६० विद्यार्थीनींची मुंबईच्या अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड
कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची सुवर्णसंधी
‘कृष्णा नर्सिंग’च्या ६० विद्यार्थीनींची मुंबईच्या अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड
कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची सुवर्णसंधी
कराड : प्रतिनिधी –
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील ६० विद्यार्थीनींना मुंबईतील सुप्रसिद्ध कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या विद्यार्थीनींना नोकरीची संधी मिळाली आहे.
या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, मनुष्यबळ अधिकारी अनोरा बाप्टिस्टा विशेष उपस्थित होत्या. प्रारंभी कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या ६६ विद्यार्थी-विद्यार्थीनींची स्टाफ नर्स पदासाठी मुलाखत घेण्यात आली. यापैकी ६० विद्यार्थींनींची निवड करुन, त्यांना तत्काळ ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते म्हणाल्या, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. सद्य:स्थितीत कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये जी.एन.एम. नर्सिंग, बी.एससी. नर्सिंग, पोस्ट बी.एससी. नर्सिंग, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअर, एम.एससी. नर्सिंगसह पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे नर्सिंग शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेले दोन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे.
याप्रसंगी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. मंदार माळवदे, सहसमन्वयक तेजस भोसले, डॉ. प्रकाशे नरेगल, डॉ. स्वाती इंगळे, सौ. संगीता पाटील, सौ. उज्वला माने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.