वन विभागाकडील पाठपुराव्यानंतर पाणीप्रश्न सुटेल : आ. पृथ्वीराज चव्हाण
वन विभागाकडील पाठपुराव्यानंतर पाणीप्रश्न सुटेल : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड, प्रतिनिधी : वांग नदीवरील पाणीयोजना लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर वांग खोऱ्यातील वानरवाडी पाझर तलाव पाणी साठवण्यासाठी आणखी सक्षम होईल का? याचाही प्रयत्न सुरू आहे. तलावाचे वनक्षेत्रातील अपूर्ण काम लवकर पूर्ण होईल, याबाबत वनविभागाशी पाठपुरावा केला जात आहे. वनविभागाने सहकार्य केल्यास पूर्ण तारूख परिसराचा कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वानरवाडी – तारुख (ता. कराड) येथील सभामंडप, अंतर्गत सिमेंट काॅंक्रीट रस्ता आणि साकव पुलाचे उद्घाटन तसेच पाझर तलावाची पाहणी अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड.उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काॅंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील, माजी उपसभापती रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण, प्रा.राजेंद्र भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने पाण्याचे संकट येवू नये, याकरिता पाठपुरावा सुरू आहे. टॅकरने पाणी पुरवठा होईलच. मात्र या विभागातील पाझर तलाव प्रवाहित झाल्यास पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
यावेळी आ. चव्हाण यांनी वानरवाडी, पवारवाडी, शिबेवाडी, खड्याचीवाडी, चाळकेवाडी, बामणवाडी, तारूख येथील गणेश उत्सव मंडळाना भेटी दिल्या. यावेळी मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. तानाजी पवार यांनी आभार मानले.