आटके येथे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते ७ कोटी ३७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
आटके येथे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते ७ कोटी ३७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
कराड, : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून आटके (ता. कराड) येथे सुमारे ७ कोटी ३७ लाख रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. अतुल भोसले यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून आटके येथे ५ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या जाधव मळा येथील रस्त्याचे, जलजीवन मिशन अंतर्गत एकूण १ कोटी ७७ लाखांच्या निधीतून होणाऱ्या नवीन पाण्याच्या टाकींचे आणि १० लाख रुपयांच्या निधीतून २५/१५ अंतर्गत मंजूर झालेल्या आटके-दुरुंग पाणंद रस्त्याचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर सरपंच सौ. रोहिणी पाटील, कृष्णा कृषी विकास परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, भैरवनाथ सेवा सोसायटीचे चेअरमन अरविंद पाटील, माजी पं. स. सदस्य डॉ. राजेंद्र पाटील, संजय पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, राजेश जाधव, कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की आटके येथील जाधव मळा येथील रस्त्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न राज्य सरकारच्या सहकार्यामुळे मार्गी लागला असून, या रस्त्यामुळे या परिसरातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. गावात एकाचवेळी अनेक विकासकामे होत असल्याने याचा लाभ भविष्यात ग्रामस्थांना होणार आहे. आटके जाधवमळा येथील स्मशानभूमीसह रस्त्याची अन्य प्रलंबित कामे ताबडतोब मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी गट – तट विसरून एकत्र यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी यावेळी केले.
आटके गावातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी आणणाऱ्या अतुलबाबांना भरघोस पाठिंबा देऊन, ग्रामस्थांनी त्यांचे हात बळकट करावेत असे आवाहन भैरवनाथ सेवा सोसायटीचे चेअरमन अरविंद पाटील यांनी केले. निवास जाधव व बाळकृष्ण काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ॲड. काकासाहेब जाधव, स्वाती जाधव, निलेश पाटील, उत्तमराव जाधव, जयवंतराव जाधव, मनिषा पाटील, प्रतीक्षा पाटील, संजय जाधव, सुरेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.