कृष्णा कारखान्याकडून प्रतिटन १०० रुपये ऊसबिल जाहीर
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार वर्ग
कराड : प्रतिनिधी –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३ या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.
कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. या हंगामात कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, ११ लाख ८० हजार क्विंटल साखर पोती निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे.
कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना ३००० रुपयांचे ऊसबिल अदा केले आहे. तर आता प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे आणखी ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.